जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे यांचा जागतिक गौरव, जानवली घरटनवाडीतील रजनीश राणे हे सामना या वृत्तपत्राचे वृत्त संपादक आहेत. ज्येष्ठ पत्रकार ही झाली त्यांची एक ओळख, पण त्यांची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे मराठी भाषा चळवळीचा कार्यकर्ता म्हणून. स्वामीराज प्रकाशन या आपल्या संस्थेमार्फत ते दर महिन्याच्या २७ तारखेला ” मराठी आठव दिवस” हा उपक्रम साजरा करतात. या उपक्रमाला एक वर्ष झाले. २७ मार्च २०२२ कोल्हापूर येथून या उपक्रमाला सुरुवात झाली. मग कणकवली, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे ,नाशिक, शिर्डी,कुडाळ, बेळगाव , नालासोपारा आदी ठिकाणी मराठीची दिंडी गेली. मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि संवर्धन यासाठी सुरू झालेला उपक्रम आता चळवळ बनली असून त्याची दखल जागतिक मराठी अकादमी या संस्थेनेही घेतली.
पुणे येथे जागतिक संमेलनात रजनीश राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी रजनीश राणे यांचे शिल्प घडवले. मराठीचा ध्यास घेतलेले रजनीश यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.