Maghi Ganesh Jayanti / माघी गणेश जयंती
हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते, जी ग्रेगोरियन कॅलेंडरच्या जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान येते. या वर्षी माघी गणेश जयंती २५ जानेवारी २०२३ या दिवशी असून आपल्या जानवली गणपतीची वाडी येथील गणेश मंदिरात विविध कार्यक्रम, सत्यनारायण, पूजाअर्चा, प्रार्थना, आरत्या, हळदीकुंकू समारंभ यांच्या सोबत दशावतारी नाटक देखील आयोजित केले जाते.
जानवली साटमवाडी येथील गणेश मंदिरात गणेश मूर्ती पूजन, मंदिर प्रदक्षिणा व महा आरती, महाप्रसाद, लहान मुलांचे विविध खेळ तसेच रात्रौ ८ नंतर सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित केला जातो
या दिवशी गणेश भक्त आवर्जून गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊन खालील स्तोत्र पठण करून श्री गणरायाचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घेतात…
श्री गणरायाचे जयजयाजी गणपती (श्री गणपती स्तोत्र)
जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।
करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।
तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती ।
विष्णू शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥
तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक ।
सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥
मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात ।
देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥
माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे ।
संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥
गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती ।
मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥
तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय ।
तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणापती ॥
गजवदना श्री लंबोदरा, सिद्धीविनायका भालचंद्रा l
हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥
भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना ।
परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥
विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा ।
पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे ॥
नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता ।
नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे ॥
नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची ।
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥
मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण ।
लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा ॥
मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक ।
भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी ॥
मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी ।
अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥
हे गणपतीस्त्रोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन ।
विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै ॥
त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात ।
स्वामिची पुजा करोनी यथास्तित, स्तुतिस्त्रोत्र हे जपावे ॥
होईल सिद्धी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता ।
गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥
इति श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्। श्री गजाननार्पणमस्तु।