Anganewadi Jatra-Yatra 2023 : माउली भराडी देवीनं कौल दिला! २०२३ मध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी असणार सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा
महाराष्ट्रात जत्रा किंवा यात्रा हा एक श्रद्धेचा उत्सव, असंख्य खेडोपाड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची/यंत्रांची उत्सुकता साधारण दर वर्षी पाहायला मिळते.
आधिदेवता, कुलाचार, ग्रामदेवता, कुळदेवता आणि पंचक्रोशीतील देवदेवता अशा देवदेवतांच्या जत्रा सध्या स्थानिकांपुरताच आवडीचा किंवा महत्वाचा विषय राहिलेला नसून, राज्य, देश विदेशात देखील अनेकांसाठीच हा मोठ्या श्रद्धेचा आणि रूढी परंपरेचा विषय झालेला आहे. महाराष्ट्र आणि परदेशात असणाऱ्याही सिंधुदुर्ग किंबहुना कोकणवासियांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या आई श्री भराडी देवीच्या जत्रेची यंदाची तारीख देवीच्या कौला नुसार निश्चित झाली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील म्हणा किंवा कोकणातील आंगणेवाडी भराडी देवीची यंदाची यात्रा दिनांक ४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. पूर्वांपार चालत आलेल्या प्रथेनुसार देवीचा कौल घेऊनच यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला आणि या यात्रेला येत असतात. भाविकांबरोबरच राज्यभरातील राजकीय नेतेमंडळींची तसेच कलावंत, उद्योगपति सर्व स्तरावरील भक्तगणांचीही मोठी गर्दी या यात्रेला दिसते. यंदाच्या वर्षी किमान १०-१२ लाखांच्या आसपास भाविक यात्रेला येतील असा अंदाज मंदीराच्या कार्यकारिणीकडून तसेच इतर माध्यमांच्या मार्फत वर्तवला जात आहे कारण कोरोनाचे सावट टाळल्याने आता भाविकांमध्ये प्रचंड उत्साह प्रत्येक कार्यक्रम, सोहळ्यात पाहायला मिळतो.
देवीच्या यात्रेची तारीख कळल्यापासून ठिकठिकाणहून आता अनेक चाकरमान्यांनी, भाविकांनी गावाला जाण्यासाठीचे प्रयत्न सुरु केलेत काहींनी ग्रुप बुकिंग, रेल्वे, एसटी आरक्षण, खाजगी प्रवास वाहतूक याची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असणार यात शंका नाही. नोकरीच्या ठिकाणी सुट्ट्यांची तळमळ म्हणू नका, धंदा व्यवसाय इतरां कडे सोपविण्याचे सोपस्कार करण्यापासून ते अगदी गावाला जाण्यासाठीची व्यवस्था ते अगदी देवीचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या नोकरी धंदयाला माघारी येण्यासाठीची व्यवस्था याकरिता अनेकांचीच धडपड एव्हाना सुरु झालीय. देवीची हि यात्रा दरवर्षी पाहण्याचा मोह भक्तगणांना आपसूक देवीकडे घेऊन येतो हे विशेष आहे.
नवसाला पावणारी माउली आई भराडी देवी मालवण तालुक्यातील मसुरे गाव आहे. या गावातील आंगणेवाडी नावाची जी वाडी आहे त्या वाडीत ‘भराडी देवी’ विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा जवळ जवळ माळरानच आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.
मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या अलोट गर्दी आणि नितांत श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं अथवा साकडं घालून आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात. दर वर्षी इचपूर्ती नंतर भक्ती भावाने आपले नवस देखील फेडतात.
जानवली गावातून प्रचंड प्रमाणात भक्तगण देवीच्या दर्शनासाठी यात्रेला आवर्जून जातात देवीच्या यात्रेला जाण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशनपासून डेपोपर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. या कणकवली बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने एसटी बसेस असतात.
कोकणातील जणू प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेलं आणि नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर अगदी देशविदेशात देखील पसरलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील या पवित्र पंढीरीची वारी एकदा तरी घडावी असे वाटले नाही तर नवलच.
आई देवी भराडी माउलीच्या नावानं चांगभलं… सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!