मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले कोकणातील एक नितांत सुंदर गाव – जानवली. जानवली गावचा जत्रोत्सव दिवस पहिला एकादशी – स्थळ सखलवाडी येथे आज उत्साहात भाविकांचा सहभाग.
जानवली हे गाव कणकवली तालुक्याच्या अगदी सीमेलगत वसलेले आहे. हे गाव १२ वाड्यांचे असून कोकणातील केंद्रस्थानी असलेले एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. विशेषतः मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी तालुक्याच्या निकटचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गाव धार्मिक व सांस्कृतिक वारशासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
जानवली गावातील सर्वात प्रमुख उत्सव म्हणजे “ताटाची जत्रा”, जी दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनंतर पहिल्या पंधरवड्यात साजरी केली जाते. या वर्षी ताटाची जत्रा ३० नोव्हेंबर २०२४ रोजी असून, या पवित्र दिवशी गावात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
गावातील देव लिंगेश्वर व देवी पावणाई यांचा वार्षिक उत्सव “देव दिवाळीच्या” या काळात सुरू होतो. साधारणतः कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीपासून या उत्सवाला सुरुवात होते. एकादशीला सखल वाडी येथून देवस्थळांच्या पूजाअर्चेचा प्रारंभ होतो. या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन होते.
पूजेनंतर, वाजत-गाजत, भजन, लोकनृत्य आणि उत्साहाने भरलेला जुलूस जणू वारकरी सांप्रदाया प्रमाणे देवाला घेऊन गावातील या सखल वाडी च्या स्थळावर पारंपरिक पूजा विधी, महाप्रसाद झाल्यावर वाडीतील घरांसमोरून मार्गक्रमण करतो. भक्तांनी भरलेला हा जनसमुदाय अखेरीस देवळात पोहोचतो. असा जल्लोषमय आणि भक्तीमय माहोल पाच दिवस पहायला मिळतो आणि हि जानवली गावाची एक विशेष ओळख आहे.
जानवली गावाचा हा पारंपरिक उत्सव गावकऱ्यांच्या श्रद्धा व संस्कृतीचे प्रतिबिंब असून, संपूर्ण कोकणातील लोकांसाठी तो एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. चला तर आज पासून सुरु होणाऱ्या या जत्रोत्सवात शक्य होईल तसे सहभागी होऊन देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे आवर्जून दर्शन, आशीर्वाद घेऊया…