महाराष्ट्रातील मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले सुंदर गाव – जानवली. सध्या हिवाळ्याच्या कडक थंडी मध्ये गजबजलेले पहावयास मिळते ते अर्थात येथील ताटाच्या जत्रेमुळे आज द्वादशी अर्थात दुसरा दिवस. चव्हाटा ब्राह्मणस्थळ,कुरकाळ ब्राम्हणस्थळ,भानमळा ब्राह्मणस्थळ, परबवाडी ब्राम्हणस्थळ, वाकाडवाडी ब्राम्हणस्थळ, वायंगवडेवाडी ब्राह्मणस्थळ असे विविध ठिकाणी देवांची भेट, महाप्रसाद, तळी आणि भजन कीर्तन करीत देवळात येण्याचा उत्सव साधारणतः पाच दिवस म्हणजेच अमावस्या पर्यंत सतत चालू असतो.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कडेला, कणकवली तालुक्याच्या सीमेलगत वसलेले जानवली हे गाव कोकणातील एक मध्यवर्ती आकर्षक पर्यटन केंद्र आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या गावाची खास ओळख म्हणजे येथील वार्षिक “ताटाची जत्रा” जी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मुंबई ते गोवा, महाराष्ट्र राज्य, देश प्रदेशात हि विशेष करून भाविकांची उपस्थिती पहावयास मिळते. यंदा ही जत्रा ३० नोव्हेंबर २०२४ रोजी असून, भाविकांनी गावात ठिकठिकाणाहून येण्यास सुरुवात केली आहे.
लिंगेश्वर आणि पावणाई देवीचा उत्सव
दरवर्षी देवदिवाळीच्या दरम्यान जानवलीतील लिंगेश्वर आणि पावणाई देवीचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. कार्तिक कृष्ण एकादशीपासून सुरू होणारा हा उत्सव पाच दिवस चालतो. यामध्ये गावातील महत्वाच्या स्थळांवर, प्राचीन देवस्थानांमध्ये भाविकांची महाप्रसादाची भोजन व्यवस्था असते. वाजतगाजत आणि लोकनृत्यांसह देवांना त्यांच्या स्थळांवरून देवळात आणण्याचा आनंदोत्सव पाहायला मिळतो.
ताटाची जत्रा आणि भाविकांचा उत्साह
अमावास्येच्या रात्री, देवदिवाळीच्या पूर्वसंध्येला ताटाची जत्रा भरते. या दिवशी मुंबई-गोवा परिसरातील चाकरमानी, माहेरवाशिणी, आणि त्यांचे मित्रमंडळ एकत्र येऊन देवी-लिंगेश्वराच्या तसेच देवी पाव्हनाईचे दर्शनाचा लाभ घेतात. भाविक रात्रभर रांगेत उभे राहून देवीकडे आपल्या समस्या मांडतात, ताटाचे दर्शन घेऊन नतमस्तक होतात आणि तिचा आशीर्वाद घेतात.
रंगतदार वातावरण आणि मालवणी स्वाद
रात्रभर गावात रोषणाई असते. जत्रेमध्ये विविध खेळ, खेळणी, स्थानिक पदार्थ आणि विशेषतः मालवणी खाजे, खडखडे लाडू, बंगाली खाजा आणि शेंगदाणा लाडू भाविकांना आवडतात.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि दशावतारी नाटक
उत्सवाच्या निमित्ताने दशावतारी नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय, “जानवली ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई”तर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित होतो, जो मुलांना आणि तरुणांना प्रोत्साहन देतो.
देवदिवाळीचा दिवस
उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे देवदिवाळीचा दिवस. या दिवशी भाविक देवीच्या ओट्या भरतात, देव लिंगेश्वराचे दर्शन घेतात, आणि नवस फेडतात.
वारसा जपणारा उत्सव
जानवली गावातील हा उत्सव भाविकांसाठी एक अविस्मरणीय आणि मंगलमय अनुभव आहे. या सोहळ्याचे महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.