जानवली गावात येऊन येथील मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले तर नवलच. जानवली गावात प्राचीन श्री देव लिंगेश्वर यांचे मंदिर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूला गर्द वनराई आहे. एका बाजूला सुंदर तलाव आहे. देव लिंगेश्वर हे ग्रामदैवत अत्यन्त जागृत तसेच नवसाला पावणारे आहे.
जानवली गावची ग्रामदेवी पावणाई हिचे मंदिर देखील देव लिंगेश्वराच्या मंदिरा नजीक आहे. देवी पावणाई हे सुद्धा एक जागृत देवस्थान असून दर वर्षी भक्तगण देवीच्या वार्षिकाला देवीच्या यात्रेला येऊन देवीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा करतात.
गावात मुंबई गोवा महामार्गावर एक सुंदर हनुमानाचे मंदिर असून असंख्य भाविक येथे दर्शनाला येतात. मारुती रायाच्या या मंदिरात दर वर्षी सालाबाद प्रमाणे अनेक सप्ताह कार्यक्रम असतात.
मारुती मंदिराकडून हाकेच्या अंतरावर विठ्ठल रखुमाई व साईबाबा मंदिर मुंबई गोवा महामार्गावर पहावयास मिळते.
जानवली सखल वाडी येथे देव श्री गणपती तसेच नवीनच विठ्ठल रखुमाईच्या मंदिराची भुरळ देखील भक्तगणांना होतेच.
घरटणवाडी येथील पुरातन राधाकृष्ण मंदिर भाविकांना मनशांती देणारे आहे याही मंदिरात अनेक कार्यक्रम होत असतात.
गणपतीची वाडी येथील श्री गणेश मंदिर हे एक जागृत देवस्थान गणेश भक्तांसाठी निसर्गाच्या सानिध्यात सुंदर आणि सुबक स्थान येथे दर संकष्टीला प्रचंड गर्दी आढळून येते.
दळवी वाडी येथील भवानी आई मंदिर देखील देवीच्या भक्तांना देवीच्या आशीर्वादाने त्यांच्या मनोकामना पूर्ण करते.
मुंबई गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी पटकी देवीचे स्थान आहे येथे दर वर्षी सालाबाद प्रमाणे जत्रोत्सव असतो.
अशा विविध देव देवतांच्या मंदिरांची आणि त्यांच्या आशीर्वादाने आजूबाजूच्या परिसरात मंगलमय वातावरण पाहावयास मिळते.