सूर हरपला…
१५ जुलै १९३२ साली जानवली गावठणवाडी येथे एक सूर जन्माला आला अर्थात सोनू – काशिबाई याना पुत्ररत्न प्राप्त झाले श्री लिगेश्वर पावणाईचे आशीर्वाद आणि देवी सरस्वतीचे कृपाशिर्वाद असलेल्या या नामदेव साटम (सहदेव सोनू साटम) यांच्या जीवनाचा प्रवास सुरु झाला.
वडील मुंबई स्थित गवाळीया टॅंक विभागात मेताजी (मुनीमजी) म्हणून कार्यरत होते. परंतु एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे आई काशिबाई सोबत व काका, काकी परिवारा सोबत वडिलोपार्जित शेती करत शालेय शिक्षणाची सुरवात झाली. अगदी लहान वयातच वडिलांच्या दुःखद निधनाने वडिलांचे छत्र हरपले आणि सुरु झाला आयष्याचा संघर्ष.
पारंपरिक शेती करता करता शालेय शिक्षणाची जोड आणि त्यातच लागली भजनाची ओढ. भजन आरत्यांना आवर्जून वेळ काढून त्यात भरीस भर शेजारील शालेय सवंगड्यांसोबत माननीय बबन पंडित राणे, नाना पंडित राणे, सगुण तुकाराम राणे यांच्या सोबत खेळता बागडतानाच नाटकाची आवड निर्माण झाली नाटकं पहाता पहाता आवड म्हणून त्याचा सरावही चाले.
एस एम हायस्कुल, कणकवली येथे मध्यमिक शिक्षण घेत असताना अनेक मित्रमंडळी संपर्कात आल्याने आयष्याला एक वेगळं वळण मिळालं. माननीय मधु मंगेश कर्णिक, कणकवली माजी सरपंच सुरेश माणगावकर यांच्या सारख्यांचा सहवास मिळाल्याने जीवनातील विविध रंग, साहित्याची विविध अंग याची जाणीव झाली.
जुनी एस एस सी म्हणजे अकरावी बोर्डाची परीक्षा रत्नागिरी येथे झाल्यावर आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणाला खंड पडला आणि त्यांनतर सुरु झाला मुंबईचा प्रवास. मुंबईत त्यावेळी गिरण गावात अर्थात टेक्सटाईल इंडस्ट्री मध्ये प्रचंड प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्याने एका नामांकित मिल मध्ये कारकून म्हणजेच क्लार्क ची नोकरी मिळाल्यावर पुन्हा एकदा खटाव मिल भायखळा येथे काम करण्याची नवीन संधी मिळाली.
खटाव मिल मध्ये नोकरी करताना प्रचंड जण सम्पर्क वाढला त्यात खटाव मिलच्या भजन मंडळाची धुरा सांभाळायची जबाबदारी सोपवली गेली. आणि खरी पुण्याई येथेच फळाला आली आज पर्यंत केलेले भजनाचे सराव संगीत गुरुवर्य माननीय सावंत गुरुजी यांचे मार्गदर्शन यामुळे मिलच्या भजनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला अनेक बक्षिसे – पारितोषकं मिळाली. दूरदर्शन वर देखील भजनाच्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले.
भांडुप मध्ये वास्तव्यास असताना अनेक भजन मंडळात हिरहिरीने सहभाग घेऊन आपल्या कलेचे योगदान दिले आपली आवड आपली साधना इतरांसोबत वाटण्यात धन्यता मानली. माननीय काशीराम परब बुवा, कणकवलीचे बागवे बुवा, संगीत शिक्षक दळवी गुरुजी, शाहीर देसाई अशा अनेक मान्यवरांसोबत काम करता करता आपली कला सादर करण्याचा अनोखा आनंद जोपासला.
खटाव मिल मधून निवृत्त झाल्यावर जानवली गावी पुन्हा एकदा जोमाने शेती करून आपली शेतीविषयक आस्था, गुरांढोरांवरील प्रेम आणि गावच्या मातीशी जोडलेली नाळ आणि जानवली गावठणवाडी प्रासादिक भजन मंडळाच्या वाटचालीतील आपला खारीचा वाटा यात स्वतःला धन्य मानून वेळोवेळी सद्गुरू भालचंद्र महाराजांच्या मठात देखील भजन करण्याचा योग पूर्व पुण्याई मुळे मिळाल्याचे त्यांनी अनेक वेळा नमूद केले.
पत्नी सौ. सत्यवती सहदेव साटम यांच्या आकस्मिक जाण्याने वृद्धपकाळातील तब्ब्ल १४ वर्षे मणक्याच्या दुखण्यापायी असंख्य यातना सहन करून त्याची जाणीव देखील भेटीसाठी येणाऱ्यांना करू न देता त्यांचे हसत मुखाने स्वागत करणे परंतु हे शक्य होते ते त्यांच्या धाकट्या चिरंजीव सत्यवान सहदेव साटम याच्या पितृसेवेमुळे भक्त पुंडलिका प्रमाणे माता पित्याची सेवा करण्याचे भाग्य त्याला मिळाले आणि ती पुण्याई त्याने आनंदाने जपली देखील.
अशा या भगवंताचे गुणगान गाणाऱ्या भगवंताच्या भक्ताचा सूर हरपला दिनांक २ मार्च २०२३ रोजी राहत्या घरी जानवली गावठणवाडी येथे त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या असंख्य आवडीच्या अभंग, भारूड, गवळण, भजनात आवडीच्या पंक्ती मधील तूच सूर ठाव मजशी तूच एकतारी सगुण रूप दावी देवा एकदा तरी… उभा जन्म झिजुदे माझा चंदना परी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी… या प्रमाणे आपले उभे आयुष्य चंदना प्रमाणे उगळून सत्कर्मी लावला. ते जिथे असतील तिथे त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…