जानवली गाव हे मुंबई गोवा महामार्गावर वसलेले असून १२ वाड्यांचे हे गाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. जानवली गाव हे तसे कनकवली तालुक्याचा भाग असून कनकवली शहरा लगतच आहे दोघांच्या मध्ये जानवली नदी आहे. मुबलक पाणी उपलब्ध असलेले शेती प्रधान तसेच पूर्वजांच्या रूढी परंपरेचा वारसा जपणारे असे हे गाव येथे येण्याची पर्यटकांना देखील भुरळ पडलीनाही तर नवलच.
जानवली गाव तसे सर्व सुख सोयींनी समृद्ध असून विकासाच्या दृष्टीने देखील ग्रामस्थांची प्रयत्नांची पराकाष्टा चालूच असते. जानवली गाव हे देव लिंगेश्वर व देवी पावणाई यांच्या आशीर्वादाने तसेच यांच्या कृपादृष्टीने सर्व स्तरावर आपला ठसा उमटवीत आहे.
जानवली गाव कला, क्रीडा, संस्कृती, तसेच शैक्षणिक उपक्रम या बाबतीत नेहमीच अग्रणी असते. जानवली गावाने आज पर्यंत उत्तम कलाकार, उत्तम खेळाडू तसेच उत्तम पदवीधर दिले आहेत.
जानवली गावाच्या सीमा लगतच्या भागात काही पुरातन पुण्यस्थळ देखील आढळतात जेथे पांडवांचे वास्तव्य असल्याचे ऐकिवात आहे.
जानवली हे तालुक्याच्या केंद्रस्थानी असून रेल्वे स्थानक, एसटी बसस्थानक, प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे, नदी, तलाव, पुरातन मंदिरे, तारांकित हॊटेल्स ची देखील सोय येथे उपलब्ध आहे.
जानवली गावात देव लिंगेश्वर व देवी पावणाईचे वार्षिक म्हणजेच देवदिवाळीच्या आदल्या दिवशीची दिव्याची जत्रा हि पंचक्रोशीतच नव्हे तर मुंबई गोवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, किंबहुना भारतात हि बऱ्याच अंशी परिचित असून भाविकांची अलोट गर्दी येथे पाहावयास मिळते.