द्रविडी भाषेतील ज्ञानवल्ली शब्दावरून जानवली…
संस्कृत भाषेत वल्ली या शब्दाचा अर्थ वेल असा होतो. आपल्या कडे बऱ्याच गावांच्या अंती ‘वल्ली’, ‘पल्ली’ सारखे शब्द आहेत. द्रविडी भाषेत म्हणजेच दाक्षिणात्य भाषेत ‘वल्ली’, ‘पल्ली’ हे शब्द ‘शहरवाचक’ आहेत. कर्नाटक हा आपल्या जवळच दाक्षिणात्य प्रदेश. परंतु कानडी बरोबरच मल्याळम, तामिळ यां सारख्या भाषांतील शब्दांचा प्रभाव आपल्या कडील गावांना पडलेल्या नावांच्या बाबतीत दिसून येतो. भाषाशास्त्राचा अभ्यासक या नात्याने ‘जानवली’ या गावाच्या नावाच्या बाबतीत मी सांगेन की, शक्यता अशी आहे की, ‘जानवली’ चे पूर्वीचे नाव ‘ज्ञानवल्ली’ असे असावे. हिंदीत ‘ज्ञ’ चा उच्चार ‘ग्य’ असा होतो. ‘ग्य’ चा उच्चार ‘ज’ असा झाला असावा. त्यावरून ‘ज्ञानवल्ली’ शब्दाचा उच्चार पुढे अपभ्रंशाने ‘जानवली’ असा झाला असावा. त्यावरून ‘ज्ञानवल्ली’ अन त्याचेच पुढे ‘जानवली’ असे नामकरण झाले असावे, असे मला वाटते.
वाचक मित्रहो, प्रसिद्ध कवी डॉ. विद्याधर करंदीकर यांनी भाषा शास्त्राचा अभ्यासक या नात्याने ‘जानवली’ गावाच्या ‘नावांच्या गावा’ चे विवेचन वरील प्रमाणे केले आहे. ते अगदी आमच्या ‘जानवली’ गावाला तंतोतंत ‘फिट्ट’ बसणारे आहे. याचे कारण हेच की, ‘सर्व बाबतीत जाणकार असलेल्या लोकांचे गाव म्हणून जानवली’ अशी आम्हा लोकांची धारणा आहे! ‘परंपरा स्वागताची… इथे सावली कोकणची’ असा सिंधुदुर्गातील पहिल्या ‘नीलम्स कंट्रीसाईड’ या त्रितारांकित हॉटेलचा स्वागत फलक आहे. नीलम्स कंट्रीसाईड ही जानवलीची शान आहे. पण स्वागत फलकावरील या ओळी जानवली गाव पाहूनच फलक तयार करणाऱ्याला सुचल्या असाव्यात, असा हा सुंदर जानवली गाव मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीला बगळामिठी मारून असलेला. कणकवली म्हणजे काय? तर जानवली व गडनदीच्या मधला वसलेला प्रदेश म्हणजे कणकवली. जानवली पुलाच्या अलीकडे आलात की कणकवली नि पलीकडे गेलात की जानवली… जानवली, कणकवलीला इतकी बिलगून आहे. हा जो जानवली पूल म्हणून ओळखला जाणारा पूल आहे ना तो ब्रिटिशांच्या काळात बांधला गेलेला आहे. या पुलासाठी वापरलेला जो काळा दगड आहे, तो जानवली माळातला काढून वापरलेला आहे. आमचे पणजोबा बाबाजी राणे आणि महादेव विश्राम राणे हे या पुलाच्या बांधकामाचे मुकादम होते, हे नमूद करण्यात आम्हाला अभिमान वाटतो.
जानवली पूल झाला नव्हता तेव्हा जानवलीकरांचा कणकवलीशी संबंध हा होडीमार्गेच असे. होडीमार्गे गणपती-साना चौंडेश्वरी मंदिरमार्गे कणकवली असे दळणवळण चाले. काळ बदलला. जानवली नदीही काहीशी रोडावली. जानवली पूल झाला कणकवलीला जिल्ह्यात महत्व प्राप्त झाले. कणकवली वाढू लागली परिणामी जानवलीचेही रुपडे आतासे पालटू लागले आहे.
काही गोष्टी या गावाच्या ‘Assets’ असतात. जिह्यातील नेते माजी आमदार स्व. केशवराव राणे यांचे निवासस्थान याच जानवलीत आहे. राष्ट्रपतिपदक मिळविलेले पोलिस अधिकारी रामचंद्र महादेव राणे हे याच जानवलीतले. १९८५ मध्ये जोगेश्वरीत दाऊद गँगच्या सशस्त्र टोळीशी सामना करून १५ कोटीचे बेकायदा सोने जप्त केलेल्या कस्टम पथकातील असि. कमिशनर सुरेश राणे हे याच जानवलीतील. राज्याचे माजी तंत्रशिक्षणमंत्री दत्ताजी राणे ही जानवलीतीलच. रवी राणे उदय राणे, शशी राणे असे जिल्ह्यातील गाजलेले भजनीबुवा याच जानवली गावातले. अशी हि मंडळी म्हणजे आमच्या जानवली गावाची ‘असेट’ च होत.
२३ एकरात पसरलेली देवराई हे जानवलीचे आणखी एक वैशिष्ट्य होय. या देवराईत ‘गंगेची कोंड’ म्हणून एक स्थान आहे. तिथे पूर्वी कधीतरी गंगा प्रकट झाली होती. ती गंगा पुन्हा प्रकट व्हावी, अशी ग्रामस्थांची तीव्र इच्छा असून गंगेने प्रकटावे म्हणून ग्रामस्थ तिला मनोमन साकडं घालत असतात. जानवलीत राजसत्ता ही राणेंची आहे, लिंगेश्वर-पावणाई हे ग्रामदैवत. पावणाई मंदिराचे सुमारे पस्तीस लाख रुपये नियोजित खर्चाचे पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात येत आहे. विशेष असे की, याकामी देणगीदारांची नावे भिंतीवर वा फरशीवर लावायची नाहीत कारण हा देवाच्या श्रद्धेचा विषय आहे, असा ग्रामस्थांचा दंडक आहे.
गावाच्या चव्हाटा, कुळकार, ब्राम्हणीस्थळ, ब्राह्मणदेव (कणकवली सीमा), वडाचा खांब (तरंदळे सीमा) अशा पाच सीमा आहेत. या ठिकाणी गावाच्या रखवालदाराचा वावर असतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
जाणकारांच्या म्हणण्याप्रमाणे, आज जो भाग चव्हाटा म्हणून ओळखला जातो तिथे प्रथम काही राणे मंडळी स्थायिक झाली अन मग गाव वसला. चव्हाट्यावर पूर्वी वस्ती होती पण प्लेगच्या साथीत वस्ती हलली. तिथे पूर्वी घरे होती. याच्या खुणा आजही चौथऱ्याच्या रूपाने पहावयास मिळतात.
स्रोत – नावांच्या गावा (पुस्तक प्रकाशित)
संपादन – विजय शेट्टी